मतदार यादीतील घोटाळ्यावरून मनपा आयुक्‍त अस्तिक कुमार पांडेय यांनी घेतली निवडणूक विभागाची हजेरी

Foto
औरंगाबाद, दि. 13 (सांजवार्ता ब्युरो)ः मनपा निवडणुकीकरिता नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यात मोठे घोळ असल्याचे समोर आले. यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. यामुळे संतापलेल्या मनपा आयुक्तांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा बैठक घेत अधिकार्‍यांना चांगलेच झापले. काही अधिकार्‍यांवर तर थेट संताप व्यक्त करीत खुर्चीत बसून काम करता, फिल्डवर का गेला नाहीत ? अशा शब्दात सुनावल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढील महिन्यात पार पडणार आहे. याकरिता प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. परंतु वॉर्ड रचनेप्रमाणेच या मतदार याद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे प्रकार समोर आले. या मतदार यादीतून लाखभर मतदारांची नावेच गायब करण्यात आली असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे तीन विद्यमान नगरसेवकांची नावे देखील मतदार यादीतून उडविण्यात आली आहे. यानंतर याविषयी मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले. या सर्व प्रकारामुळे वॉर्ड रचने नंतर याद्यामध्येही मनपाच्या कार्यपद्धतीवर कुठेतरी संशय व्यक्त केला जात होता. यामुळे मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय चांगलेच संतापले. त्यांनी सायंकाळी 6 वाजे नंतर मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे बैठक घेत निवडणूक संबंधी अधिकार्यांना चांगलेच झापले. यावेळीही नगर रचना सहाय्यक संचालक आर. एस. महाजन व ए.बी. देशमुख यांना सुनावत फिल्डवर जाऊन काम का केले नाही ?  फिल्डवर गेले असते तर अशा चुका झाल्या नसत्या असेही आयुक्त म्हणाले. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत आयुक्तांचे रौद्र रूप पाहून अधिकार्यांना चांगलाच घाम फुटला होता. सायंकाळी आठ वाजेपर्यंत या बैठका सुरू होत्या. अशी माहितीही सूत्रांनी दिली.
कर वसुलीत हलगर्जी; बजावली कारणे दाखवा नोटीस
मनपाची कर वसुली समाधान कारक नाही. यामुळे या कामात हलगर्जीपणा करणार्या अधिकारी-कर्मचारी आयुक्तांचा रडारवर असल्याचे वृत्त सांजवार्ता ने प्रकाशित केले होते. या अनुषंगाने आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशासनाने 11 अधिकारी-कर्मचार्‍यांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावत तात्काळ खुलासा सादर करण्याचे सांगितले आहे.  
एकीकडे  शहरातील मालमत्ता धारकांकडे मनपाची कोट्यवधींची थकबाकी आहे. या थकबाकीचा आकडा 500 कोटींवर गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना कर वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने मनपाच्या तिजोरीत मात्र खडखडाट असल्याचे चित्र पाहायला मिळते. ही परिस्थिती बदलण्याकरिता आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अस्तिक कुमार पांडेय यांनी कर वसुलीवर मोठ्याप्रमाणावर जोर दिला. यानंतर कर वसुलीला गती मिळाली. कर वसुलीच्या माध्यमातून अपेक्षेपेक्षा जास्त पैसा  तिजोरीत जमा झाला. परंतु यानंतरही काही ठिकाणी परीस्थिती बदलेली दिसून आली नाही. पाणीपट्टीची वसुली करण्याकरिता तर समांतरचा डेटा ही वॉर्ड कार्यालयांना पुरवण्यात आला. यानंतरही परिस्थिती जैसे थेच होती. अधिकारी कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार होत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर स्वतः आयुक्तांनी याचा शोध घेतला. यावेळी  हलगर्जीपणा करणारे 10 अधिकारी-कर्मचारी आयुक्तांच्या रडारवर आले होते. यात पुढे आणखी एकाची भर पडली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या दिशेने पावले पडणार असल्याचे वृत्त सांजवार्ता ने प्रकाशित केले होते. यानंतर गुरुवारी प्रशासनाने या 11 अधिकारी कर्मचार्यांना  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासह तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे खुलासे प्रशासनाला प्राप्त होणे अपेक्षित आहे.  खुलासा समाधानकारक आला नाही तर संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे देखील समजते.



Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker